गुटखा सप्लाय गुन्ह्यात कुडाळ न्यायालयाने सुनावली होती न्यायालयीन कोठडी
जिल्हा न्यायालयात रिविजन अर्ज सुनावणीत ठोठावली पोलीस कोठडी
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कुडाळमधील गुटखा रेड मधील आरोपीला गुटखा पुरवणारा बांद्यातील गुटखा किंग भूषण उर्फ आबा श्रीकृष्ण शिरसाट ( वय 59 ) याला कुडाळ न्यायालयाने सुनावलेली न्यायालयीन कोठडी रद्द करत जिल्हा न्यायालयाने आरोपी आबा शिरसाट याला 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कुडाळ पोलिसांनी 22 ऑगस्ट 2025 रोजी कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील आरोपी निलेश प्रकाश कांबळी याच्या राहत्या घरातून सुमारे 65 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. आरोपी निलेश याला हा गुटखा बांदा येथील भूषण उर्फ आबा शिरसाट याने पुरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.त्यावरून आरोपी आबा शिरसाट याला कुडाळ पोलिसांनी अटक करून कुडाळ न्यायालयात हजर करत अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.मात्र पोलिसांची मागणी फेटाळून कुडाळ न्यायालयाने आरोपी आबा शिरसाट याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
कुडाळ न्यायालयाने आरोपी आबा शिरसाट याला सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीविरोधात कुडाळ पोलिसांनी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात रिविजन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाची सुनावणी आज जिल्हा न्यायाधीश श्रीमती विद्या देशमुख यांच्या न्यायालयात झाली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना कुडाळ पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 65 हजार रुपयांचा गुटखा आरोपी निलेश प्रकाश कांबळी याच्या ताब्यात मिळून आला होता. कुडाळ पोलिसांनी केलेल्या तपासात बांदा येथील भूषण उर्फ आबा श्रीकृष्ण शिरसाठ वय 59 याने सदरचा गुटखा आरोपी क्रमांक एक याला पुरवल्याचे निष्पन्न झाले होते. सदर गुन्ह्याच्या दरम्यान आरोपी निलेश कांबळी व भूषण शिरसाट यांच्यामध्ये अनेक वेळा फोनवरून संपर्क झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. भूषण शिरसाट याच्याविरुद्ध मालवण पोलीस ठाणे व यापूर्वी सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात सुद्धा गुटख्याच्या संदर्भातील केसेस दाखल झालेले आहेत. आरोपीचा पूर्व इतिहास, तसेच गुन्ह्यातील सहभाग व गंभीर गुन्हा या सर्व बाबी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी युक्तीवादावेळी
कोर्टाचे निदर्शनास आणून दिल्या. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी कुडाळ न्यायालयाने आरोपी भूषण उर्फ आबा शिरसाट याला सुनावलेली न्यायालयीन कोठडी रद्द करून त्याला 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.












