कै.न्हानू सावंत व कै.सुहासिनी सावंत यांच्या स्मरणार्थ आयाेजन
कणकवली (प्रतिनिधी) : कै.न्हानू सावंत व कै. सुहासिनी सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा अमित सावंत यांच्या वतीने तरंदळे गावातील महिलांची देवदर्शन वारी यंदाही उत्साहात पार पडली. दरवर्षीप्रमाणे यावेळी देवदर्शनाचा लाभ गावातील वृद्ध महिलांनी देखील घेतला.
पार पडलेल्या या यात्रेत सातेरी देवी, श्री बाळूमामा, श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी, भारतातील पहिले साई मंदिर, माणगाव दत्तमंदिर, श्री काशी विश्वेश्वर मंदिर, श्री यक्षिणी मंदिर, पिंगुळी मठ, श्री स्वामी समर्थ मठ आदी विविध मंदिरांचे दर्शन घेण्यात आले. तसेच महिलांनी सविता वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वयोवृद्धांची विचारपूस केली.
आपल्या आई-वडिलांना आधार द्यायच्या वयात काहींना आश्रमात राहावे लागते, ही खंत व्यक्त करत सर्व महिलांनी आश्रमास देणगी दिली. यावेळी अमित सावंत यांनीही गावात जमा होणाऱ्या जुन्या वस्तू व कपडे येथील आश्रमात देण्याचा संकल्प व्यक्त केला.
अमित सावंत हे “काम तुमचं, प्रयत्न आमचे” या ग्रुपमार्फत गावातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात व आलेल्या सर्वांना सुख-समाधान लाभावे, अशी प्रार्थना सर्व महिलांनी श्री बाळूमामा चरणी केली.
या यात्रेत गीता मुणगेकर, नम्रता देवलकर, अश्विनी चव्हाण, रमा सावंत, साक्षी परब, दर्शना गावकर, गजानन तेली, जनार्दन राणे, मुंबरकर, पुजारे आदी सहभागी झाले होते.












