दोन दुचाकींचे नुकसान, तर एक महिला जखमी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : झोप अनावर झाल्याने इर्टिगा कारचालकाने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात बसची वाट पाहणाऱ्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाली असून तिला सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज दि २१ सप्टेंबर २०२५ सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, बाळूमामांचे दर्शन घेऊन परत येत असताना तळवडे येथे जाणाऱ्या एका चालकाला झोप अनावर झाल्याने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना त्याने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात सातुळी बावळाट येथील भास्कर परब आणि माडखोल येथील लक्ष्मण गावडे यांच्या दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.












