साकेडी गावातील रेल्वे फाटक अंडरपासला मंजुरी ; २ कोटींचा निधी मंजूर

खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

सरपंच सुरेश साटम व उपसरपंच प्रज्वल वर्दम यांची माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साकेडी गावातील रेल्वे फाटक पडल्यानंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आता वाहनचालक आणि पादचाऱ्यांची सुद्धा सुटका होणार असून याठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून अंडरपास मंजूर झाला आहे. अंडरपास साठी 2 कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर झाला आहे. माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी अंडरपास मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे साकेडीवासीयांची प्रदीर्घ प्रलंबित असलेली मागणी पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती साकेडी सरपंच सुरेश साटम, उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी दिली. साकेडी गावात असलेल्या रस्त्यावरील कोकण रेल्वे रुळावरून रेल्वे ये-जा करत असताना रेल्वे फाटक बंद केले जाते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणावर रहदारीची समस्या निर्माण झाली होती. रेल्वे फाटकामुळे साकेडी गाव दोन भागांत विभागले गेले असून ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, रेशन दुकान, आरोग्यकेंद्र या महत्त्वाच्या सुविधा रेल्वे फाटकाच्या पलीकडे असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांच्या मागणीनुसार रेल्वे अंडरपासच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असुन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असुन या अंडरपासच्या माध्यमातून शाळकरी मुले, रुग्णवाहिका तसेच ग्रामस्थांना ये-जा करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता होत असून वाहतूकीसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.

या कामासाठी माजी मुख्यमंत्री व खासदार श्री. नारायण राणे तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी विशेष पाठपुरावा करून मदत केली आहे.असे सरपंच साटम उपसरपंच वर्दम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्यारे सांगितले आहे.

error: Content is protected !!