विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम हाच माझ्यासाठी खरा पुरस्कार – नेहा मोरे

जि.प. शाळा आशिये येथे बदलीनिमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न

कणकवली,3 ऑक्टोबर (प्रतिनिधी)=जि.प. शाळा आशिये येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका नेहा मोरे यांची बदली झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ सत्कार समारंभ शाळेत आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेला आक्रंदून भावना व्यक्त केल्या, तर सौ. मोरे यांनीही आपल्या मनोगतातून सर्वांच्या हृदयाला स्पर्श करणारे शब्द उच्चारले.

आपल्या मनोगतात बोलताना सौ. नेहा मोरे म्हणाल्या, “या शाळेत मी जे काही दिलं, त्यापेक्षा कितीतरी अधिक मला विद्यार्थ्यांकडून प्रेम, स्नेह आणि विश्वास मिळाला. तेच माझ्यासाठी खरा पुरस्कार आहे. इथे काम करत असताना इथे मिळालेली माणसं, आठवणी आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे हास्य माझ्या हृदयात कायमच कोरले जाईल.”त्यांच्या या बोलांनी सभागृहातील वातावरण अधिकच हळवं झालं. काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, तर अनेकांनी मॅडमभोवती गर्दी करून त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी आशिये शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा सावंत तसेच शिक्षक सतीश कदमसर, शिक्षिका वृषाली मसुरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.निधी पुजारे, उपाध्यक्ष संजय बाणे, पांचाळ तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या वतीने सौ. मोरे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
नेहा मोरे यांनी आपल्या बदलीनिमित्त शाळेला सिलींग पंख्यांची भेट देत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या सद्भावनेचे शाळा व्यवस्थापन, पालकवर्ग व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.

नेहा मोरे यांची नुकतीच बदली झाली असून, आशिये शाळेत त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली. आपल्या कार्यकाळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले.सौ. मोरे यांनी आपल्या शाळेला काही उपयोगी वस्तू द्याव्यात असा विचार करत सिलींग फॅन भेट दिले. या पंख्यांमुळे विद्यार्थ्यांना उष्म्यापासून दिलासा मिळेल आणि शैक्षणिक वातावरण अधिक सुखद बनेल.
या वेळी बोलताना सौ. मोरे म्हणाल्या, “या शाळेने मला खूप काही दिलं. विद्यार्थ्यांचं प्रेम, सहकाऱ्यांची साथ, आणि पालकांचा विश्वास – या साऱ्यांची परतफेड कधीच शक्य नाही. ही भेट म्हणजे माझ्या कृतज्ञतेचे एक छोटेसे प्रतीक आहे.”

मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि पालकांनी त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश कदम सर यांनी मानले.

error: Content is protected !!