ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिराचे जल्लोषात उद्घाटन संपन्न
खारेपाटण हायस्कूलमधील क्रीडा कक्षाचेही उद्घाटन संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटण आणि सिंधुदुर्ग अमॅच्युअर ऍथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन शुभारंभ खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळ जवळ साठ खेळाडू या प्रशिक्षणार्थी शिबिरामध्ये सहभागी झाले होते. दिनांक १९ एप्रिल ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिराला सिंधुदुर्ग ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव समीर राऊत, अंजली गायकवाड, तेजस्विनी नाईक, ओम उन्हाळकर, सुवर्णा जोशी इत्यादी क्रीडा प्रशिक्षक सहभागी विद्यार्थी खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. वरील प्रशिक्षण कालावधीत थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी तसेच १०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे,४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना केले जाणार आहे. त्याचबरोबर शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील क्रीडा कक्षाचेही उद्घाटन याप्रसंगी संपन्न झाले. या क्रीडा कक्षामध्ये विविध क्रीडा साहित्य उपलब्ध केलेले आहे. तसेच बैठे खेळ खेळले जाणार आहेत. या सर्व उद्घाटन समारंभासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्या मनाली होणाळे, खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष ऋषिकेश जाधव, पालक शिक्षक संघाच्या सदस्या तृप्ती पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्या मनाली होणाळे यांच्या शुभहस्ते फीत कापून या प्रशिक्षण शिबिराच्या क्रीडा साहित्य हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य संजय सानप, ऋषिकेश जाधव, मनाली होणाळे, समीर राऊत या मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेल्या प्रशिक्षणार्थींची निवासाची व भोजनाची व्यवस्थाही प्रशालेमार्फत करण्यात आलेली आहे. रोज सकाळी ७.००ते दुपारी १२.०० व संध्याकाळी ४.०० ते ६.३० या वेळात हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे.