खारेपाटण महाविद्यालयात एम. ए. आणि एम. कॉम पदव्युत्तर अभ्यासक्रमास मंजुरी
खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र (CDOE) यांच्या माध्यमातून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एम ए व एम कॉम या पदव्युत्तर अभ्यासक्रमास चालू शैक्षणिक वर्षापासून मंजुरी मिळाली असून यामुळे ग्रामीण भागातील पदव्युत्तर उच्च शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
खारेपाटण महाविद्यालयात सन २०२५ – २६ या शैक्षणिक वर्षा पासून सुरू करण्यात येत असलेल्या एम. ए. व एम. कॉम या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संदर्भात नुकताच एक सामंजस्य करार मुंबई विद्यापीठ येथे संचालक, दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र मुंबई विद्यापीठ आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्यात दि.१० ऑक्टोंबर २०२५ रोजी करण्यात आला. त्यामुळे आता खारेपाटण दशक्रोशीतील असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तसेच परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेऊन शकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या गावातच उच्च शिक्षण घेण्याची कवाडे येथील खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने खुली झाली आहेत.
याबाबत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर व सर्व विश्वस्त यांच्या वतीने खारेपाटण महाविद्यालयात नव्याने मंजुरी मिळालेल्या एम. ए. व एम. कॉम अभ्यासक्रम संदर्भात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी आपली नावे दि. १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे नोंदवावीत. असे आवाहन खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी. कांबळे यांनी केले आहे.












