विद्यार्थ्यांनी आर्थिक बचतीची सवय लावून, आर्थिक शिस्त अंगीकारावी – शाखाधिकारी मुसळे

फोंडाघाट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस भेट! अर्थशास्त्र विभागाचा शैक्षणिक उपक्रम!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा – फोंडाघाट येथे क्षेत्रीय भेट (Field Visit) आयोजित केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत ‘अनुभवाधारित शिक्षण’ या उद्दिष्टाचा भाग म्हणून ही भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बँकेचे कार्यकाज प्रत्यक्ष पाहिले, बँक कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि सहकारी बँकिंग व्यवस्थेचे विविध पैलू जाणून घेतले.

या प्रसंगी शाखाधिकारी अभिजीत मुसळे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यांनी सहकारी बँकेतील लिपिक भरती प्रक्रिया, किसान क्रेडिट कार्ड योजना, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादी योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी आजपासूनच बचतीची सवय लावून आर्थिक शिस्त अंगीकारावी, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सहकारी बँकांचे ग्रामीण व आर्थिक विकासातील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “विना सहकार नाही उद्धार” त्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीच्या मागे न लागता स्थानिक पातळीवर बँकांच्या माध्यमातून भांडवल उभे करून शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन केले.

या शैक्षणिक उपक्रमात अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विद्यार्थ्यांनी बँकेतील व्यवहार पद्धती, लेखा प्रक्रिया व ग्राहक सेवा यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून मौल्यवान अनुभव घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची नवीन प्रेरणा मिळाली आणि हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणाला दिशा देणारा ठरला. हा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबत सहकारी क्षेत्राबद्दल जागरूकता निर्माण करणारा ठरला.

error: Content is protected !!