मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत देणार एक दिवसाचे वेतन
कणकवली (प्रतिनिधी) : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियनकडून सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत मदत म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक आणि कर्मचारी वर्ग आपले एक दिवसाचे वेतन देणार आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (DNE १३६) जिल्हा शाखा सिंधुदुर्गतर्फे हा निर्णय घेण्यात आला असून, युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मधुकर वर्दम व सरचिटणीस संतोष सुधाकर पालव यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हे नुकसान भरून न निघणारे आहे. त्यासाठी संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-१३६ चे राज्यभरातील अधिकारी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.












