सावंतवाडी (प्रतिनिधी) : आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उच्चशिक्षित अॅड. व नोटरी नीता सावंत कविटकर या इच्छुक असल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरू लागली आहे. शिवसेना (शिंदे गट) महिला जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या अॅड. कविटकर या सामाजिक कार्याचा व कायदा व्यवसायातील दीर्घ अनुभवाच्या जोरावर नगराध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतील, असा विश्वास स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
अॅड. नीता सावंत कविटकर या गेली अनेक वर्षे सावंतवाडीतील सामाजिक, शैक्षणिक आणि महिलांसाठीच्या विविध उपक्रमांत सक्रिय आहेत. महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती, नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा आणि कायदेशीर सल्ला–मसलत या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
१९९४ मध्ये वकिली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सावंतवाडीत कायदा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्या काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होत्या. मागील पंधरा वर्षांपासून त्या शिवसेनेच्या उपजिल्हा संघटिका म्हणून काम पाहत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून त्यांच्यावर महिला जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्या जबाबदारीचे त्यांनी यशस्वीपणे पालन केले आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस दृष्टीकोन व पारदर्शक कारभाराची गरज असल्याचे मत अॅड. कविटकर यांचे समर्थक व्यक्त करतात. नागरिकांच्या अपेक्षा ओळखून विकासाभिमुख आणि जनसंपर्कप्रधान कारभार करणे हे त्यांचे ध्येय असल्याचे त्या सांगतात.
अॅड. कविटकर यांच्या वडिलांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली असल्याने देशसेवा आणि सामाजिक बांधिलकी हे संस्कार त्यांना बालपणापासून लाभले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून बचत गटांच्या महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यामुळे सावंतवाडीतील महिलांच्या मनात त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटावर सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, त्यात कायदेतज्ञ व अनुभवी राजकारणी म्हणून अॅड. नीता सावंत कविटकर या नगराध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून उदयास आल्या आहेत. त्यांच्या इच्छुकतेमुळे सावंतवाडीतील राजकीय समीकरणांना नवचैतन्य प्राप्त झाले आहे.












