गोठ्याला आग ; वित्तहानी

देवगड (प्रतिनिधी) : पडेल (देवरूखकरवाडी) येथे गुरुवारी मध्यरात्री यशवंत सखाराम देवरूखकर यांच्या गोठ्याला अचानक भीषण आग लागून संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटना रात्री अंदाजे ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती समजताच ग्रामपंचायतीचे उपसरपंच विश्वनाथ पडेलकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व प्राथमिक चौकशी केली.

घटनेच्या वेळी यशवंत देवरूखकर, त्यांचा मुलगा संदीप, सुन दीपलक्ष्मी आणि नात पेर्वा हे सर्वजण घरात झोपलेले होते. त्यामुळे आग लागल्याचे त्यांना समजले नाही. मात्र शेजारी राहणाऱ्या पडेलकर कुटुंबाच्या आग लागल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आरडाओरड करून सर्वांना जागे केले. ग्रामस्थांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत गोठा पूर्णतः जळून गेला होता.

सुदैवाने परीसरातील गवत ओले असल्याने जवळच असलेल्या हापूस कलम बागांना आग लागण्यापासून बचाव झाला, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता. या घटनेमुळे देवरूखकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, ग्रामस्थांनी तातडीने प्रशासनाकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

error: Content is protected !!