गाय आणि वासरू चित्र रंगभरण स्पर्धेत सोहम, तनया व स्वराचा चमकदार विजय

वसुबारस निमित्त जि. प. केंद्रशाळा रामगड नं. १ येथे उपक्रमाचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) : वसुबारस या पावन पर्वानिमित्त जि. प. केंद्रशाळा रामगड क्रमांक १ येथे के. जी. पांग्रडकर / राणे, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–२, रामगड यांच्या मार्फत गाय आणि वासरू चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम क्रमांक – सोहम हरिश्चंद्र घाडीगावकर, द्वितीय क्रमांक – तनया नामदेव राणे, आणि तृतीय क्रमांक – स्वरा शंकर घाडीगावकर यांनी मिळवला. विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक प्रवीण तेली यांनी गाय-वासरू आणि वसुबारस या दिवसाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, गोमातेची कृतज्ञता व्यक्त करून पशुधनाचे महत्त्व ओळखणे, निसर्गाशी नाते दृढ करणे, तसेच कुटुंबात आरोग्य, समृद्धी आणि सुख येण्यासाठी या दिवसाचे विशेष स्थान आहे. तसेच अशा उपक्रमांमुळे मुलांना चांगले संस्कार आणि समाजाबद्दल जागरूकता मिळते, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक प्रवीण तेली, सहशिक्षिका सानिका कदम, पशुधन पर्यवेक्षक किशोरी पांग्रडकर / राणे, आणि परिचर सागर तांबे उपस्थित होते.

error: Content is protected !!