आरोग्य सेवेत आदर्श ठरला सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आयुष्मान कार्ड निर्माण या वर्गवारीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील ग. दि. मांडगुळकर सभागृहात हा सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. हा पुरस्कार वितरण सोहळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी स्वीकारला. जिल्ह्यातील लाभार्थींचे १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्माण करण्यातील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी एक मोठा सन्मान आहे. आयुष्मान कार्ड निर्माण करण्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भरीव योगदान, जिल्ह्यातील ४९ गावांमधील लाभार्थींचे १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण, एकूण कार्ड निर्माणातील जिल्ह्याची कामगिरी सातत्यपूर्ण व प्रगतीशील आहे, ही पुरस्कारासाठी जिल्ह्याच्या निवडीची प्रमुख कारणे आहेत.












