कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग नगररचना विभागाचे पदकांसह वर्चस्व

ओरोस (प्रतिनिधी) :नगररचना मूल्यनिर्धारण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये सिंधुदुर्गच्या नगराच्या विभागाने दमदार कामगिरी बजावली. तब्बल 40 वर्षानंतर 11 पदकांची कमाई करत सिंधुदुर्ग जिल्ह्याने वर्चस्व राखले. नगररचना विभागाच्या या यशस्वी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन नगर रचनाकार वि. तू. देसाई, सहाय्यक नगर रचनाकार च. अ. टायशेटे यांनी केले आहे.
कोकण विभागीय नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांच्या कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा नवी मुंबई येथे संपन्न झाल्या. कोकण विभागातील आठ संघातील 260 हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. क्रिकेट, कॅरम, टेबल टेनिस,200 मीटर धावणे, रिले यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगररचना विभागाच्या खेळाडूंनी चमक दाखविली. क्रिकेट स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग उपविजेता ठरला असून बेस्ट बॅट्समन म्हणून प्रीतम गायकवाड यांनी पदक पटकावले आहे. श्रीमती श्रद्धा जाधव हिने महिलांच्या कॅरम स्पर्धेमध्ये विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर महिलांच्या चाळीस वर्षाखालील टेबल टेनिस मध्ये श्रीमती प्राजक्ता गावडे हिने प्रथम क्रमांक, श्रीमती सोनल अजळकर हिने द्वितीय क्रमांक तर श्रीमती श्रद्धा जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. पुरुषांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत श्रीकृष्ण वेंगुर्लेकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महिलांच्या खुल्या गटातून रिले स्पर्धेत श्रीमती सोनल अजळकर श्रीमती श्रद्धा जाधव श्रीमती प्राजक्ता गावडे व श्रीमती रोहिणी नागरे या महिलांनी द्वितीय क्रमांक पटकावून या स्पर्धेतही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर महिला रस्सी उड्यामध्ये श्रीमती श्रद्धा जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. सिंधुदुर्गच्या नगररचना विभागाच्या या विजेता स्पर्धकांनी तब्बल सहा मेडल व पाच चषका सह पारितोषिक पटकावली असून या सर्व स्पर्धक विजेत्यांचे नगररचना विभागाचे सहसंचालक कोकण विभाग यांनी खास अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!