मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे विजदरात 44 टक्के कपात लागू
मत्स्योद्योगमंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मत्स्य व्यवसायाला चालना आणि मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा देण्यासाठी फडणवीस-शिंदे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही वीज दरात सवलत मिळणार आहे. मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा दिल्यामुळे ही सवलत लागू करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने हा ऐतिहासिक निर्णय जारी केला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो मच्छीमार, मत्स्य संवर्धक आणि संबंधित व्यावसायिकांना थेट आर्थिक लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत मच्छीमार, मत्स्य संवर्धक, मत्स्य व्यवसायिक मत्स्यकास्तकार या सर्व घटकांना आता त्यांच्या मत्स्य व्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्याने मच्छीमारांना केवळ वीज सवलतच नव्हे तर किसान क्रेडिट कार्ड, कृषी दराप्रमाणे कर्ज सुविधा आणि नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाई यांसारखे अन्य लाभही मिळणार आहेत. सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित मत्स्य व्यवसाय प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे, अशी अट शासनाने घातली आहे.
मत्स्य उत्पादनात वाढ होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा तसेच या क्षेत्रातील रोजगार निर्मितीला चालना देणारा हा निर्णय गेम चेंजर ठरेल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.










