निवती रॉक परिसरात मासेमारी करणाऱ्या मेंगलोरच्या मासेमारी नौकेवर कारवाई
कुडाळ (प्रतिनिधी) : परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा महाराष्ट्रातील सागरी जलक्षेत्रात धुडगूस घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळील महाराष्ट्राच्या सागरी जलदी क्षेत्रात शनिवारी सकाळी अनधिकृतपणे घुसखोरी करून मासेमारी करत असताना मासेमारी नौकेवर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. कर्नाटकमधील मेंगलोर येथील मासेमारी नौका वेंगुर्ला निवती रॉक परिसरात मासेमारी करत असताना मत्स्य विभागाच्या शीतल गस्ती नौकेने अनधिकृत मासेमारी करत असताना कारवाई केली. या मासेमारी नौकेवर म्हाकुल, बांगडा, सुरमई, कोळंबी, सौंदाळा असे मासे मिळाले असून यावर पुढील दंडात्मक कारवाईसाठी मत्स्य विभाग कारवाई करणार आहे. कोकण किनारपट्टीवर मागील अनेक वर्षांपासून परप्रांतीय ट्रॉलर्स धुडगूस चालूच आहे. परंतु याबाबत प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. परंतु, परप्रांतीय ट्रॉलर्सचा हा उच्छाद कमी होताना दिसून येत नाही. गुजरात, कर्नाटक या राज्यातील ट्रॉलर्स मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीवर वेंगुर्ले, निवती, मालवण, विजयदुर्ग, देवगड समुद्रकिनारी भागात मच्छीमारी करतात.
सध्या समुद्रात मोठ्या प्रमाणात मासळी मिळत असली तरी परप्रांतीय ट्रॉलर्सच्या हैदोसामुळे स्थानिक मच्छीमार त्रस्त झाले आहेत. एकंदरीत परप्रांतीय मच्छीमारांचा कोकणातील समुद्रात असणारा वावर येथील स्थानिक मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान करीत आहे. यासाठी प्रशासनाने गस्ती नौकांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.