शेतकऱ्यांमध्ये पसरली नाराजी
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ बागायती शेतकऱ्यांसाठी आधारवाड असलेली प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील खारेपाटण विभागातील लाभार्थी शेतकऱ्यांना सन २०२४ – २५ आर्थिक वर्षातील नैसर्गिक आपत्ती नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून अद्याप न मिळ्याने शेतकरी बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,नैसर्गिक आपत्तीमुळे शेकऱ्यांच्या फळबागायतीचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचा पिकांचा विमा काढण्यात आला होता. तर खरीप हंगामात अवकाळी पाऊस व अतीवृष्टी झाल्याने काजू व आंबा आदी पिकांचे नुकसान झाले होते. यापैकी काजू लागवड धारक शेकऱ्यांना त्यांच्या विम्याची रक्कम या दिवाळीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाने जमा केली मात्र आंबा पीक घेणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या नुकसानीची भरपाई अद्याप न मिळ्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आपल्याला नुकसानीची भरपाई कधी मिळणार असा सवाल आता शेतकरी बांधव करू लागले आहेत.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळ पीक विमा योजनेचा लाभ काही अंशी शेकऱ्यांना मिळाला असून खारेपाटण व तळेरे सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावामधील एकूण ५०० लाभार्थी शेतकरी बांधवांना विमा कंपनी कडून अंदाजे सुमारे १ कोटी रुपये पर्यंतची नुकसानीची रक्कम शेतकरी बांधवांना विमा कंपनी देणे बाकी असल्याचे समजते. तरी सदर पीक विम्याच्या नुकसानीची रक्कम येथील फळ बागायती शेकऱ्यांना त्वरित मिळावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.












