प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी उद्या हाेणार प्रसिद्ध
कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीवर तब्बल १०२० सूचना आणि हरकती दाखल झाल्या. गेले तीन दिवस या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर उद्या ३१ ऑक्टोबरला अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.दरम्यान शहरात २०० हून अधिक दुबार मतदार आहेत. ज्यांचे नाव कणकवली नगरपंचायत क्षेत्रात आणि लगतच्या गावातील ग्रामपंचायतींमध्येही आहे. अशा दुबार मतदारांबाबत निवडणूक निर्णय अधिकारी कोणता निर्णय घेतात याची प्रतीक्षा आहे.
गेली दोन वर्षे लांबलेली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर कणकवली नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या तब्बल १०२० सूचना आणि हरकतींवर दाखल झाल्या. मोठ्या प्रमाणात सूचना, हरकती दाखल झाल्याने गेले तीन दिवस सक्षम अधिकाऱ्यांमार्फत नगरपंचायतीमध्ये हरकतींवर सुनावणी प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या ३१ ऑक्टोबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र दाखल झालेल्या सूचना आणि हरकतींपैकी किती फेटाळल्या गेल्या आणि किती स्वीकारल्या गेल्या याबाबतची माहिती नगरपंचायतीकडून उपलब्ध झालेली नाही.
कणकवली नगरपंचायत क्षेत्रात २०० हून अधिक दुबार मतदार आहेत. ग्रामपंचायत आणि कणकवली नगरपंचायत अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये या मतदारांची नावे आहेत. त्यामुळे हे दुबार मतदार वगळावेत अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली होती. या दुबार मतदारांबाबत कोणता निर्णय घेण्यात आला याबाबतचीही माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झालेली नाही.












