डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणातील आरोपींची कोठडी वाढवली; खुनामागचं कारण अद्याप गूढ

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील साळीस्ते येथे रस्त्याच्या कडेला बेंगलोर (कर्नाटक) येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी (वय ५६) यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेला काही दिवस उलटले असले तरी खुनामागचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही.

कणकवली पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने कर्नाटकातील विविध ठिकाणांहून चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांत मधुसूदन सिद्धय्या तोकला (५२, रा. बेंगलोर), सुभाष सुब्बारायाप्पा एस. (३२), नरसिमहा नारायणस्वामी मूर्ती (दोघेही रा. कोलार) आणि मनु पी. बी. (रा. रामनगर) या चौघांचा समावेश आहे. सुरुवातीला सात दिवसांची पोलीस कोठडी झाल्यानंतर न्यायालयाने तपासाच्या दृष्टीने ती दोन दिवसांनी वाढवली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अद्याप कोणताही ठोस खुलासा करण्यात आलेला नाही. खून नेमका कुठे झाला, त्यामागे आर्थिक, वैयक्तिक की कौटुंबिक कारण होते, की हा सुपारीखून होता — हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

डॉ. रेड्डी यांच्या खून प्रकरणाचा तपास गुप्ततेच्या पडद्यामागे सुरू असल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, पुढील तपासातून या रहस्यमय प्रकरणाचा उलगडा होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!