शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या जोरावर भारताची महासत्तेकडे वाटचाल – पालकमंत्री नितेश राणे

सामाजिक समतेला अनुसरून क्रांतिकारी निर्णय घेणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा

पालकमंत्री नीतेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने नागरी सत्कार

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्व आणि बुद्धिमत्तेचा मी एक अभ्यासक आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आदर्शाचा माझ्यावर प्रभाव आहे. आपला देश शिवशक्ती आणि भीमशक्ती च्या संगमातून महासत्तेकडे वाटचाल करत आहे. मागासवर्गीय घटकांच्या वाड्या वस्त्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा निर्णय घेणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा आहे. यासाठी मला साथ देणाऱ्या सर्व समाजबांधवांचा मी आभारी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वाड्या वस्त्या आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार ओरोस येथील जिल्हा पत्रकार भवन मध्ये करण्यात आला. भारतीय संविधान प्रस्ताविकेची प्रतिमा, शाल ,पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी संविधानिक हितकारिणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, अंकुश जाधव, गौतम खुडकर, रमाकांत जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

समाजहित साधण्यासाठी संविधानिक हितकारिणी महासंघ हे अराजकीय व्यासपीठ बनवून समाजाचा फायदा करून घेण्यात आला आहे. एरव्ही एकमेकांच्या विरोधात असणारे मागासवर्गीय समाजातील विविध पक्ष आणि संघटनेतील पदाधिकारी संविधानिक हितकारिणी महासंघाच्या द्वारे एकसंघ झाले. वंचीत घटकांसाठी आयोजित जनता दरबारात खऱ्या अर्थाने तळागाळातील जनतेची दुःखे समजली. या जनता दरबारातून आलेले प्रश्न सोडविण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इतिहास रचला आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आज सर्वसामान्य जनतेला संविधानिक हक्क मिळतात. भारत देश हा बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा देश आहे. भारतीय संविधानाच्या ताकदीवर मी प्रवाहाविरुद्ध जाऊन समाजहितासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी वाड्या वस्त्या रस्त्यांचे जातीवाचक नावे बदलण्याचा आयुक्तांना असलेले अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी 192 वाड्या वस्त्या आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा अध्यादेश काढला. इच्छाशक्ती असली तरच सामाजिक प्रशासकीय बदल होऊ शकतात. त्यामुळेच आपला सिंधुदुर्ग जिल्हा आज शासकीय निधी खर्च, ए आय प्रणाली जातीवाचक वाड्या वस्त्या रस्त्यांची नावे बदलणारा राज्यातील आणि देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. राजकीय विरोधक एकत्र येऊन विरोध करतात तेव्हा मला लढाईसाठी आणखी बळ मिळते. माझ्या जिल्ह्यात कोणताही समाजघटक विकासापासून वंचित राहणार नाही हा विश्वास देतो असेही मंत्री राणे म्हणाले.

error: Content is protected !!