लोरे गावात अनधिकृत सिलिका उत्खननचा आरोप

तहसीलदारांनी कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं. १ गावात अवैध सिलिका उत्खनन सुरू असून त्याविरोधात महसूल विभागाकडून कारवाई करण्यासाठी कणकवली तहसीलदार यांना लेखी निवेदन लोरे गावातील ग्रामस्थांनी दिले आहे.

अनधिकृत उत्खननाविरोधात तहसीलदार कणकवली यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, लोरे नं 1 गावात एका सिलिका मायनिंग कंपनीकडून मोठ्या प्रमाणात सिलिका वाळूचे उत्खनन सुरू आहे. सदर ठिकाणी खाणपट्ट्याची मागणी करण्यात आली असली तरी शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी नसतानाही अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या या उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल, शेतीक्षेत्र आणि ग्रामस्थांच्या आरोग्य व सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अमित अरुण रावराणे, विशाल विश्राम राणे, रमेश विश्राम राणे यांनी कणकवली नायब तहसीलदार यादव यांच्याकडे याबाबत लेखी निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, लोरे नं 1 गावात बेकायदा सिलिका उत्खनन सुरू आहे. यापूर्वीही या अवैध उत्खननाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा खनिकर्म विभाग आणि तहसील कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे. उलट, मागील काही दिवसांत या अवैध उत्खननाचा वेग वाढला असून सिलिका वाळूची वाहतूकही मोठ्या प्रमाणात केली जात आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ शिष्टमंडळाने अनधिकृत उत्खननाविरुद्ध तात्काळ कारवाई करून संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करावी आणि उत्खनन पूर्णपणे थांबवावे, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा बेकायदेशीर कारवायांना आळा बसावा यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!