कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला मोठा राजकीय आधार मिळाला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांना रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेतर्फे अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला.
रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ता अनिल तांबे, जिल्हाध्यक्ष रमेश बावडेकर आणि वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी कणकवलीत भेट घेऊन हा पाठिंबा जाहीर केला.
यावेळी अनिल तांबे म्हणाले,
“राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही संदेश पारकर आणि शहर विकास आघाडीला पाठिंबा देत आहोत. संदेश पारकर यांचे लोकाभिमुख राजकारण, जनतेशी असलेली जवळीक आणि विकासाभिमुख भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची ठरली. त्यामुळेच त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.”
ते पुढे म्हणाले,
“शहरातील बदलती राजकीय परिस्थिती, स्थानिक संस्थांशी झालेल्या चर्चा आणि जनतेच्या अपेक्षा लक्षात घेता संदेश पारकर हेच योग्य पर्याय असल्याचे स्पष्ट झाले.”
तांबे यांनी शहर विकास आघाडीच्या प्रचारात रिपब्लिकन सेना सक्रियपणे सहभागी होणार असल्याचेही सांगितले.
“लोकांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी संदेश पारकर सातत्याने काम करत आहेत. त्यामुळे ते प्रत्येक घरापर्यंत पोहचले आहेत. येत्या ३ डिसेंबरला त्यांचा विजय निश्चित आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.












