एस स्कॉर्ड पोलीस संरक्षण कमी करण्याची केली मागणी
अतिरिक्त पोलीस संरक्षणातून मतदारांवर प्रभाव टाकत असल्याचा आरोप
शहर विकास आघाडीत बिघाडीची ठिणगी ?
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : शिवसेना उबाठा चे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या अतिरिक्त पोलीस संरक्षणाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून आमदार निलेश राणे यांचे एस स्कॉर्ड पोलीस संरक्षण कमी करण्याची मागणी केली आहे. एकीकडे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदे सेना आणि ठाकरे सेना कणकवली नगरपंचायत निवडणूकीत एकजुटीने भाजपा विरोधात लढत असतानाच उबाठा चे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्याविरोधात केलेल्या या तक्रारींमुळे कणकवली शहरात झालेल्या शिंदे सेना आणि ठाकरे सेना युतीत सगळे काही आलबेल नसल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस, राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे, आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, आमदार निलेश राणे यांना वाय आणि एस स्कोड दर्जाचे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सध्या सिंधुदुर्गात निवडणूकीची आचारसंहिता सुरू असून नगरपंचायत , नगरपरिषद निवडणूकीची धामधूम सुरू आहे. अशात निलेश राणे आपल्याला असलेल्या वाय आणि एस स्कॉड दर्जाच्या पोलीस संरक्षणाचा वापर बेकायदेशीर रित्या मतदारांवर दबाव निर्माण करण्याकरिता करत आहेत. तसेच असलेल्या अतिरिक्त पोलीस संरक्षणातून क्रेझ निर्माण करून मतदारांवर प्रभाव टाकत आहेत. वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणेंच्या पोलीस संरक्षणाबाबत केलेल्या या तक्रारीमुळे कणकवलीत शहर विकास आघाडीत बिघाडी होण्यास सुरुवात झाली आहे.














