‘हड्या-गुड्या’ गँगचा ‘देवगन’ अखेर पोलिसांच्या ताब्यात

घरफोडी गुन्ह्यातील फरार आरोपीला सांगलीतून पकडले

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील कारागृहाच्या मागील बाजूस आणि शिल्पग्राम परिसरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला सावंतवाडी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. “हड्या-गुड्या” गँगशी संबंधित असलेला देवगन विजय उर्फ बापू पवार (वय २४, रा. आटपाडी, सांगली) याला सांगली पोलिसांच्या मदतीने सांगली शहरातून ताब्यात घेण्यात आले.

९ जुलै रोजी सावंतवाडीत झालेल्या चोरी आणि घरफोडी प्रकरणात पवारचा थेट सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. त्यासाठी पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि गौरव परब यांच्या पथकाला सांगलीला रवाना करण्यात आले होते. पथकाने २१ नोव्हेंबर रोजी आरोपीला पकडण्यात यश मिळवले.

अटक केल्यानंतर आरोपीला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी (सोमवारपर्यंत) सुनावली आहे. विशेष म्हणजे, पवार हा गोव्यातील पेडणे येथील एका घरफोडी प्रकरणातही ‘वॉन्टेड’ होता. गोवा पोलिससुद्धा त्याचा शोध घेत होते; मात्र सावंतवाडी पोलिसांनी तत्पर कारवाई करून त्याला जेरबंद केले.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर करत आहेत.

error: Content is protected !!