खारेपाटण (प्रतिनिधी) : बुद्ध, फुले, शाहू व आंबेडकर चळवळीतील कवी गायक व सामाजिक राजकीय कार्यकर्ते प्रकाश आजविलकर मूळ गाव अजिवली, ता. राजापूर, जिल्हा रत्नागिरी यांना नुकताच सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा “राजकीय सम्यक कोकण कलाभूषण पुरस्कार – २०२५” जाहीर झाला असून त्यांच्या या पुरस्कार निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सम्यक कोकण कला संस्थेच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त समाजातील विविध स्तरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना हे पुरस्कार जाहीर झाले असून प्रकाश आजविलकर हे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कवी गायनाने समाजामध्ये प्रबोधनाचे काम करत असून सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय चळवळीत देखील त्यांनी सहभाग घेतला. अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या संपूर्ण कार्याची दखल घेऊन सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने नुकताच त्यांना राजकीय सम्यक कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण मुंबई दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.












