आम्हीच खरे रक्षक आणि गुऱ्हाळ रंगवणाऱ्याचे अक्षम्य दुर्लक्ष !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : पाऊस थांबून सुमारे पंधरा दिवस होत आले तरी, फोंडाघाट ते हुमरठ (पीडब्ल्यूडी) आणि फोंडा तीठा ते घाट पायथ्यापर्यंतचे खड्डे यथातथाच बुजवले होते. मात्र सध्या त्यांची अवस्था खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे. त्यामुळे पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारापासूनच पर्यटक, वाहन चालक संताप व्यक्त करीत आहेत. नुकतेच तिठा ते मारुती वाडी रस्त्यावरील खड्डे खडी, डांबर, ग्रिटने निखिल कन्स्ट्रक्शन कडून भरण्यात आले. त्यावेळी संपूर्ण बाजारपेठेतील दुकानदार ग्रामस्थ ग्रिटच्या धुरळ्यामुळे हवालदिल झाले. यावर आठ दिवसात हॉट मिक्स डांबर घालण्यात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र आठ-दहा दिवस होऊनही कुठलीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. याचा उद्रेक होऊ नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बजरंग दल आणि आम्हीच खरे रक्षक या दोन संस्थांच्या वादात जनावरांचा प्रश्न फोंडाघाटच्या रस्त्यावर चिंताजनक होत आहे. त्यात भटक्या श्वानांच्या टोळीचा प्रादुर्भाव दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना अपघाताला निमंत्रण देत आहे. खड्डे, मोकाट जनावरे आणि श्वान त्यामध्ये ग्रिटचा धुरळा यामुळे मारुतीवाडी, एसटी स्टँड आणि घाटी उतारावर कित्येक जण अपघातग्रस्त झाले आहेत. अपंग झाले आहेत. तर दोघांना आपले प्राण गमावले लागले आहेत. मासे-चिकन-मटण विक्री या ठिकाणी श्वानांचा वावर जास्त प्रमाणात आढळतो.
याकडे चर्चेच्या गुऱ्हाळांना रंगवणारे आणि निवडणुकांच्या उमेदवारीचे गुडघ्याला बाशिंग बांधलेले सर्व स्थानिक नेते, ग्रामपंचायत व वॉर्ड सदस्य, शांतता व सुरक्षा सांभाळणारा पोलीस विभाग, निखिल कन्स्ट्रक्शन चे अधिकारी यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य स्थानिक नेते यांनी पुढाकार घेऊन खड्डे, मोकाट जनावरे, श्वानांचा वावर याकडे लक्ष देऊन, कठोर व ठोस निर्णय घ्यावेत अशी आग्रही मागणी होत आहे. म्हणजे याला जबाबदार कोण ? असा खोचक सवाल निर्माण होण्याची पाळी पर्यटक आणि ग्रामस्थांवर, व्यापाऱ्यांवर येणार नाही.












