खारेपाटण (प्रतिनिधी) : ठाणे पूर्व येथील विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने या संघटनेच्या सभासदांनी नुकतेच बदलापूर जिल्हा ठाणे येथील शाश्वत फौंडेशन संचालित सहवास वृद्धाश्रमास भेट दिली व संघटनेच्या १५ सभासदांनी प्रत्येकी रुपये ५०० ते ५००० रुपये पर्यंत देणगी दाखल रक्कम जमा करून त्यातून वृद्धाश्रमासाठी बेडशीट्स, पिलो कव्हर, अन्नधान्य, डाळी, साखर, तेल असे किराणा साहित्य व बिस्किट पुडे इत्यादी साहित्य वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका अमृता केतकर व न्यासाचे सभासद मेहेंदळे यांचेकडे नुकतेच सुपूर्द केले.
या आश्रमात एकुण ६० स्त्री – पुरुषांचे वास्तव्य असून त्यांची राहण्या जेवण्याची चांगली व्यवस्था आश्रमाच्या वतीने करण्यात आली आहे. तर येथे कमालीची स्वछता देखील ठेवण्यात आली आहे. तसेच आश्रमा करिता वाचनालयाची चांगली सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. येथील जेवणाचा दर्जा अतिशय सात्विक आणि रुचकर असा आहे. विरंगुळा संघटनेच्या १७ सदस्यांनी सदर भेटीमध्ये भाग घेऊन आश्रमाच्या आदरातिथ्य चा आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला. याबरोबरच आश्रमाच्या परिसरात सुंदर फुलझाडे आणि फळझाडे लावण्यात आली असून आजूबाजूचे वातावरण आल्हाददायक ठेवण्यात आले आहे.












