सिंधुदुर्गातील 21 गावांचा स्मार्ट व इंटेलिनजन्स व्हिलेज प्रकल्पात समावेश

पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री फडणवीस यांची साथ

वैभववाडी तालुक्यातील 21 गावे बनणार स्मार्ट व इंटेलिजन्स व्हिलेज

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्य शासनाने राज्यात ‘स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यांमधील ७५ गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्यातील या प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्यात ही गावांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील ग्रामीण भागाचे रुपांतर स्वयंपूर्ण तंत्रज्ञान सक्षम आणि विकसित समूदायांमध्ये करण्याच्या दृष्टीने स्मार्ट व इंटेलिजेंट व्हिलेज प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत डिजिटल संपर्क, ई-शासन, शिक्षण, आरोग्य, शेती, स्वच्छता आणि नवीकरणीय उर्जा यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येऊन त्यात ग्रामस्थ व स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटा आधारित निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी करून ग्रामीण जीवनमान उंचावणे आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील सातनवरी येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यानंतर आता प्रत्येक तालुक्यातील दहा गावे प्रकल्पासाठी समाविष्ट करून स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हिलेज करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार हा प्रकल्प सर्व जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये राबविण्यापूर्वी प्रथम टप्यात प्रायोगिक तत्वावर राज्यातील पाच जिल्ह्यांतील ७५ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यात नागपूरमधील १०, अमरावतीमधील २३, हिंगोलीमधील ११, पुण्यातील १० व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

वैभववाडी तालुक्यातील समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये निम अरुळे, सडुरे-शिराळे, कुर्ली, लोरे नं. २, आचिर्णे, खांबाळे, अरुळे, कुसूर, उंबर्डे, तिरवडे-तर्फ खारेपाटण, हेत, उपळे, नेर्ते, एडगाव, सोनाली, कुंभवडे, आखवणे-भोम, मांगवली, भुईबावडा, ऐनारी व मौदे या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत तसेच अडचणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकायांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता, उपवनसंरक्षक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बीएसएनएलचे जनरल मॅनेजर, जि. प.च्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.

तसेच ग्रामस्तरावर विस्तार अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार असून त्यात ग्रामपंचायत अधिकारी हे सदस्य सचिव, तर ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, आरोग्यसेवक, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक हे सदस्य असणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत स्मार्ट सेवा ज्यामध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स, वाय-फाय, हॉटस्पॉट, डिजिटल शिक्षण, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, महिला व बालविकास आदी विभागाच्या ऑनलाईन सेवा, ई प्रकल्प, स्मार्ट कृषी सेन्सर्स, आपत्ती व्यवस्थापन आदी टप्याटप्याने राबविण्यात येणार आहेत. तसेच बीएसएनएलने भारत नेट फेज १ अंतर्गत इंटरनेट जोडणी केलेली होती. त्यांना आवश्यक तांत्रिक सहाय्य यातून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ हे भारतनेट फेज २ नेटवर्कसाठी आवश्यक सहकार्य करणार आहे.

error: Content is protected !!