झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू; आचरा येथील घटना

मालवण (प्रतिनिधी) : आंब्याच्या झाडावर फवारणी करून खाली उतरताना हातातील दोरी सुटून खाली कोसळल्यामुळे मालवण भरड येथील तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अँड्रयू फ्रान्सिस कार्डोज (वय ४५, रा. भरड- मालवण) असे मृताचे नाव आहे. करारावर घेतलेल्या आंबा बागेत तो फवारणी करत होता. यावेळी ही घटना घडली.

याबाबतची खबर भाऊ, लुईस फ्रान्सिस कार्डोज (वय ४२) यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे. लुईस फ्रान्सिस कार्डोज हे गेली १० वर्षांपासून आंबा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी आचरा-भंडारवाडी येथील आंबा कलम कराराने घेतले होते. आज ते त्यांची पत्नी, भाऊ अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज आणि कामगार यांच्यासह आंबा झाडांवर फवारणी करण्यासाठी आले होते. फवारणी करण्यासाठी अँड्रयू कार्डोज हे उंच असलेल्या आंबा कलमावर चढले होते. कलमावरील फवारणी पूर्ण झाल्यानंतर ते डेरेदार कलमावरून दोरीच्या साहाय्याने खाली उतरत होते. याच दरम्यान त्यांच्या हातातील दोरी सुटल्याने अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज हे सुमारे तीस फुटांवरून झाडाखाली असलेल्या दगड-धोंड्यांमध्ये कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर आणि मनोज पुजारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर घाडीगावकर करत आहेत.

error: Content is protected !!