जन सुविधा योजनेतून ५ लाख रुपये मंजूर
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावी स्थानिक ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने शासनाच्या जन सुविधा योजना सन २०२५ – २६ निधी मधून मंजूर झालेल्या चिंचवली मुख्य रस्ता ते वरची वाडी या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ जि.प. माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या शिफारशीने जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या या रस्त्याला सुमारे ५ लाख रुपये एवढा निधी मंजूर असून या रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी चिंचवली गावचे सरपंच अशोक पाटील, उपसरपंच राजेंद्र पेडणेकर, भाजप शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, ग्रामपंचायत सदस्य मधुकर बांदिवडेकर, बळीराम भालेकर, रश्मी पेडणेकर, प्रणाली पाटील आदी मान्यवर व चिंचवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिंचवली गावातील वरचीवाडीकडे जाणारा रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच या कामासाठी प्रयत्न केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे व माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांचे तसेच व भाजप पक्षाचे चिंचवली ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले आहेत.











