“महामानवांचे विचार जिवंत ठेवणे काळाची गरज…” – सचिन कोर्लेकर
खारेपाटण (प्रतिनिधी) : “अखंड भारत देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकसंघ राहत आहेत ही सर्व किमया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची आहे आणि म्हणून महामानवांचे विचार जिवंत ठेवणे काळाची गरज आहे.” असे भावपूर्ण उदगार बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे सचिव सचिन कोर्लेकर यांनी खारेपाटण, बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रमात उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना काढले.
पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष भरत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सचिव सागर पोमेडकर, कार्यकर्ते दीपक पगारे, दीपक जाधव, श्री. कदम, बुरंबावडे गावचे माजी सरपंच रवींद्र शिंगे, पायरी सावक संघ नडगीवे या मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पगारे, मोहन पगारे, सम्यक नगर खारेपाटणचे कार्यकर्ते प्रनोल कांबळे, संघमित्र महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्षा संकिता पाटणकर, सचिव आस्था पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, कार्यकर्ते संतोष जुवारकर, संतोष तुरळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, अशोक पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पंचशील विकास मंडळाचे अध्यक्ष भरत पाटणकर व संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्ष संकिता पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे अद्यक्ष चंद्रकांत कांबळे व कार्यकर्त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी येथील बुद्धविहारात बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक बौद्ध धम्म पूजा पाठ घेण्यात आला. यामध्ये सर्व धम्म बांधवांनी सहभाग घेतला.

दरम्यान ५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ नंतर खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहार ते खारेपाटण एस. टी. बस स्थानक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत मशाल फेरी काढण्यात आली. यावेळी भीम बुद्ध गीते गाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तर नडगीवे येथील बौद्ध बांधवांनी नडगीवे बौद्धवाडी ते खारेपाटण बुद्धविहार अशी पायी फेरी काढून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी झालेल्या अभिवादन सभेत चंद्रकांत कांबळे, दिलीप पगारे, संतोष मधुकर पाटणकर यांनी मार्गदर्शन करून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. यां सपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर पोमेडकर तर आभार संतोष पाटणकर यांनी मानले.












