वैभववाडीत पहिल्या स्वयंचलित गुळ प्रकल्पाचा शुभारंभ
वैभववाडी (प्रतिनिधी) : “जिल्ह्यातील तरुणांचे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर थांबवायचे असेल, तर सिंधुदुर्गमध्ये उद्योगधंद्यांची निर्मिती अत्यावश्यक आहे. स्थानिक तरुणांनी उद्योजकतेकडे वळून पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड, नाधवडे (वैभववाडी) यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्याच स्वयंचलित गुळ निर्मिती प्रकल्पाच्या मोळी पूजन आणि लोगो अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेला गुळ निर्मितीचा उद्योग हा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद उपक्रम असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. “अशा प्रकल्पांना शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल. या उद्योगामुळे सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला नवी चालना मिळणार आहे,” असेही राणे म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












