अपघातानंतर खड्डे दुरुस्ती करणार काय?
वैभववाडी (प्रतिनिधी) : फोंडाघाट–वैभववाडी राज्यमार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर चिरे वाहतूक तसेच ऊस वाहतूक होत असल्याने ओव्हरलोड वाहनांच्या दाबाने रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवूनही कोणताही ठोस उपाय न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, अपघाती मृत्यूनंतरच पीडब्ल्यूडीचे लक्ष या मार्गाकडे जाणार का? असा सवाल वाहनचालक आणि पादचारी करत आहेत. या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, खड्डे बुजवून मार्ग वाहतुकीस योग्य करावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.












