आचरा (प्रतिनिधी) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, जांभेकर कुटुंबीय आणि ‘गुरुकुल करिअर अकॅडमी, ओरोस’ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील फक्त उच्च माध्यमिक (इयत्ता ११वी व १२वी) विभागातील विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होऊ शकतात.
सदरची वक्तृत्व स्पर्धा शनिवार दि. २७ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता गुरुकुल करिअर अकॅडमी, ओरोस (३८ बंगला, अंगणवाडी जवळ, ओरोस, ता. कुडाळ) येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी वेळेची मर्यादा: ७ मिनिटे (५+२) एवढी ठेवण्यात आली आहे. या वक्तृत्व स्पर्धेसाठी १)बाळशास्त्री जांभेकर: चरित्र आणि कार्य, २) मराठी वृत्तपत्रसृष्टीचा दीपस्तंभ – दर्पण, ३) समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर, ४) मराठी पत्रकारिता काल, आज आणि उद्या हे चार विषय ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी अंतिम दिनांक २५ डिसेंबर, २०२५ पर्यंत करावयाची आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०००/-, ३०००/- आणि २०००/- रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ६ जानेवारी, २०२६ रोजी ‘पत्रकार दिनी’ बाळशास्त्री जांभेकर यांच्या मूळ गावी पोंभुर्ले, ता. देवगड येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल.
सदरच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा अगदी मोफत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क: मोबाईल नंबर ९०७५३८५२५६ / ७२६४९ २००६२ या नंबरवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.












