देशभरातून चाळीसगावात विविध संघ दाखल
जागतिक कबड्डी महासंघाचे अध्यक्ष अशोक दास यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : अॅम्यच्यअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, अॅम्यच्युअर कबड्डी फाऊंडेशन महाराष्ट्र व जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने पाचवी फेडरेशन कप राष्ट्रीय कबड्डी क्रीडा स्पर्धा (पुरुष व महिला) शुक्रवार पासून (ता. १२) आयोजित करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या या स्पर्धेचे नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजन करण्यात आले आहे.
देशभरातून विविध राज्यातील निवडक १६ संघ सहभाग
या स्पर्धेत भारतातून महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड, ओडिसा, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक व सिक्कीम या आठ राज्यातील संघ तर हरियाणा, झारखंड, दिल्ली, पश्चिम बंगाल, विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र व बिहार या आठ राज्यातील महिलांचे संघ असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. ज्यात १९२ खेळाडू, ३२ प्रशिक्षक व व्यवस्थापक, ४० पंच व तांत्रिक अधिकारी, २५ जिल्हा व राज्य पदाधिकारी, १६ राज्य सचिव, ५ फेडरेशन पदाधिकारी व ३० स्वयंसेवक असे एकूण ३३५ जणांचा समावेश आहे.
या सर्वांची भोजन, निवास, दोन क्रीडांगणे, गॅलरी, स्टेज, मंडप आदींची व्यवस्था ही जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे केली जाणार आहे. विजेत्या संघांना ट्रॉफी, मेडल्स, प्रमुख अतिथींना सन्मानचिन्ह,बॅग, टी शर्ट, कॅप, बेंच तसेच राज्य सचिव, तांत्रिक अधिकारी, पंचांना टी शर्ट, कॅप, बेंच हे अॅम्यच्युअर कबड्डी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणार आहे.
रविवारी बक्षीस वितरण
या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवारी (ता. १४) सायंकाळी पाचला आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याहस्ते विजयी संघांना बक्षिसे प्रदान केले जाणार आहे.
जागतिक कबड्डी महासंघाचे महासचिव अॅड. ए. उशी रेड्डी यांची स्वागताध्यक्ष
याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून जागतिक कबड्डी महासंघाचे महासचिव अॅड. ए. उशी रेड्डी हे तर प्रमुख अतिथी
म्हणून उपसंचालक स्नेहल साळुंखे, पुणे मनपाच्या क्रीडा उपायुक्त किशोरी शिंदे, युवा उद्योजिका सपना वाघमोडे, कबड्डी असोसिएशनच्या सरचिटणीस भारती जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आम. मंगेश चव्हाण, भारती जगताप, आयोजन समितीचे प्रमुख एम. वाय. चव्हाण, क्रीडा सरचिटणीस अजय देशमुख, विजय संतान, बाळासाहेब जाधव, ज्ञानेश काळे, विशाल खंदारे, दीपक वाडीले, युवराज भोसले, प्रशांत पाटील, दादा देशमुख, चंद्रकांत ठिकले यांच्यासह जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.
शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन
जागतिक कबड्डी महासंघाचे अध्यक्ष अशोक दास यांची उपस्थिती
या स्पर्धेचे उदघाटन शनिवार दि.१३ रोजी सायंकाळी ५ वा महाराष्ट्र राज्य अॅम्यच्युअर कबड्डी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक कबड्डी महासंघाचे अध्यक्ष अशोक दास यांच्याहस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, क्रीडा युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा दिवसा व रात्री प्रकाशझोतात होणार असून त्याची जय्यत तयारी चाळीसगावात करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य अम्यॅच्यूअर कबड्डी फाउंडेशनच्या सरचिटणीस श्रीम. भारती जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीनीला दिली.












