चोरीसह हाफ मर्डरच्या गुन्ह्यात आरोपी अक्षय कदम चा अटकपूर्व जामीन नामंजूर

अक्षयवर अटकेची टांगती तलवार, हायकोर्टात मागावी लागणार दाद

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर डोक्यावर कोल्ड ड्रिंक्स ची बाटली फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आणि सोन्याची चैन आणि अंगठी चोरल्याच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय विक्रम कदम ( रा. आंनदव्हाळ, ता. मालवण ) याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी नामंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. कुंभारमाठ येथील खालसा ढाब्यावर 11 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री पावणे 1 वाजण्याच्या सुमारास आरोपी अक्षयसह अन्य आरोपींनी जेवण न दिल्याच्या रागातून फिर्यादी बलजिंदर निर्मल सिंह यांचा कामगार प्रदीप उगले याच्या डोक्यावर कोल्ड ड्रिंक्स ची बाटली फोडून त्याला रक्तबंबाळ केले. तसेच फुटलेली बाटली फिर्यादीच्या हातावर मारून दुखापत केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी निर्मलसिंह याच्या गळ्यातील 20 ग्रामची सोन्याची चैन आणि हाताच्या बोटातील 10 ग्रामची सोन्याची अंगठी हिसकावून घेतली अशी फिर्याद मालवण पोलीस ठाण्यात निर्मलसिंह यांनी दाखल केली होती. त्यानुसार वैभव मयेकर, छगन सावजी, प्रथमेश शिरपूटे, हरेश ढवळे, साहिल परब,राजू कांबळी, अक्षय कदम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी अक्षय कदम याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे उपस्थित केले. सदर गुन्हा गंभीर असून आरोपी अक्षय कदम तसेच राजू कांबळी सापडले नसल्यामुळे अद्याप पोलीस तपास सुरू आहे, गुन्हा घडताना अक्षय घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला आहे, साक्षीदारांनी आरोपीना निर्घृणपणे मारहाण करताना पाहिले असून ओळखले आहे, आरोपी अक्षय कदम हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे, फिर्यादीची सोन्याची साखळी तसेच अंगठी अद्याप सापडून आलेली नाही, सदर दागिने आरोपी अक्षयकडे असण्याची शक्यता असून त्याला जामीन मंजूर झाल्यास ते दागिने मिळणार नाहीत. आरोपींनी फिर्यादी निर्मलसिंह याना आपल्या हस्तकांकरवी केस मागे घ्या अन्यथा धंदा बंद करून टाकू अशी धमकी दिली असून त्याबाबत मालवण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे, आरोपी व त्याचे साथीदार हे स्थानिक असून फिर्यादी हे परराज्यातील आहेत त्यामुळे आरोपी ला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास तो फिर्यादीला मारहाण करणे धमकी देणे, जीवे ठार करण्याचा प्रयत्न करणे, मालमत्ता लुटणे आदी प्रकार करू शकतो हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सुधीर देशपांडे यांनी आरोपी अक्षय कदम चा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आरोपी अक्षय कदमवरअटकेची टांगती तलवार असून अटक टाळण्यासाठी त्याला आता हायकोर्टात दाद मागावी लागेल.

error: Content is protected !!