मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती तसेच आगामी काळातील कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांत, विशेषतः नगरपरिषद व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. निवडणूक काळात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीत काहीसा तणाव निर्माण झाला होता. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती न होण्यामागे रवींद्र चव्हाण कारणीभूत असल्याचा आरोपही निलेश राणे यांनी यापूर्वी केला होता.
मात्र अलीकडील या भेटीमुळे दोन्ही नेत्यांतील मतभेद निवळल्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी विधीमंडळ परिसरातही निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची सौहार्दपूर्ण भेट झाली होती. त्या वेळी निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण हे आपल्यासाठी मोठ्या भावासारखे असल्याचेही सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.










