देवगड (प्रतिनिधी) : हैदराबाद येथून आलेल्या एका पर्यटक महिलेला देवगड शहरातील हॉटेल मधून बाहेर पडत असताना चुकीच्या पध्दतीने शारिरीक स्पर्श करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी व तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्हयातील संशयित आरोपी विक्रांत गोळम आणि प्रथमेश मयेकर दोघे रा. जामसंडे यांची देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पचंडी यांनी सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी संशियत आरोपींचे वतीने ॲड. कौस्तुभ कमलाकर मराठे यांनी यशस्वी युक्तीवाद केला.
याबाबत अधिक हकीगत अशी की, दि. ०२डिसेंबर २०२२ रोजी देवगड शहरातील महामार्गानजीक असणाऱ्या एका प्रसिध्द हॉटेलमध्ये पिडीता व तिचे कुटुंबिय रात्रौ १०.३० सुमारास जेवण करुन बाहेर पडत होते. त्यावेळेस संशयित आरोपी विक्रांत गोळम आणि प्रथमेश मयेकर या दोघांनी दारुच्या नशेत पर्यटक महिलेला स्पर्श करुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याबद्दल आणि पिडीतेचे कुटुंबियांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल संबंधित महिलेने देवगड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली होती. पर्यटक महिलेच्या तक्रारीवरुन देवगड पोलीसांनी संशयित आरोपीविरुध्द भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३५४(अ) (१), ३२३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन संशयितांना अटक केली होती. आरोपींविरुध्द देवगड न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात प्रत्यक्ष व वैद्यकीय पुराव्यातील तफावत, उद्देश शाबित न होणे या कारणांचे आधारे देवगड न्यायालयाने संशयितांची सर्व आरोपांमधून र्निदोष मुक्तता केली आहे.









