राणे ज्या पक्षात तोच माझा पक्ष
खा. राणेंचा फोटो काढून त्यांनी कुकर्म केले, आम्ही सन्मानाने फोटो लावणार
कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर आजपासून मी समीर नलावडे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. मी राणे समर्थक कार्यकर्ता आहे. ज्या पक्षात राणे असतील तोच माझा पक्ष असेल. सत्ताधाऱ्यांनी नगराध्यक्ष दालनातील पंतप्रधान मोदी आणि खासदार नारायण राणेंचा फोटो काढला आहे. एक ना एक दिवस खासदार नारायण राणेंचा फोटो नगराध्यक्ष दालनात लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. शहराच्या विकासासाठी चांगल्या कामांना मी विरोध करणार नाही. कणकवली शहरातील जनतेच्या सेवेसाठी माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
समीर नलावडे जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत नलावडे बोलत होते. पुढे बोलताना समीर नलावडे म्हणाले की, कणकवली नगरपंचायतचा निकाल लागून आता चार दिवस उलटून गेलेत. पराभवानंतर माझ्या हितचिंतकांनी सहानुभूती व्यक्त केली. कणकवलीवासीयांनी मला 5 हजार 96 मते दिल्याबद्दल माझ्या कणकवलीकरांचा मी आभारी आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणेंच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक लढवली. 2003 पासून सलग 3 वेळा मी नगरसेवक झालो. 2018 साली नगराध्यक्ष झालो. निवडणूक हरलो असलो तरी मला कणकवली शहरवासीयांचे प्रश्न माहीत आहे. नगरपंचायत मधील त्यांचे सोडविण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. भाजपाचे 9 नगरसेवक निवडून देऊन कणकवलीवासीयांनी भाजपला लीड दिले आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.










