कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिरासमोरील हायवेवरील वहाळाजवळ संरक्षण कठड्यावर आयशर टेम्पो आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोचा चालक वाहनात अडकून पडला होता. सुदैवाने त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत.
हा अपघात आज शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची तीव्रता एवढी होती की आयशर टेम्पोचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. चालक वाहनात अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये, पांडुरंग मोरये, गुरुनाथ मोरये, संभाजी पाटील, अनिकेत बिडये, गुरु साळुंखे तसेच मार्गावरून प्रवास करणाऱ्या एस.टी. चालक व वाहकांनी मदतकार्य केले. जखमी चालकाला नरेंद्र महाराजांच्या रुग्णवाहिकेतून, रुग्णवाहिका चालक पांडू तेली यांनी उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू होती. घटनेची माहिती नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी बिट अंमलदार चंद्रकांत झोरे यांना दिल्यानंतर बिट अंमलदार चंद्रकांत झोरे, श्री. जगताप व श्री. घाडी हे अपघातस्थळी दाखल झाले व पुढील कार्यवाही केली.










