८६ स्पर्धकांचा सहभाग; गुणवंत खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
तळेरे (प्रतिनिधी) : युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत या उपक्रमाअंतर्गत मेरा युवा भारत सिंधुदुर्ग, प्रज्ञांगण, तळेरे आणि शिवमुद्रा स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५ दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी शिवमुद्रा स्पोर्ट्स अकादमी मैदान, ओझरम फाटा येथे उत्साहात पार पडल्या.
“स्वास्थ्य राष्ट्र – समृद्ध राष्ट्र” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धांचा उद्देश ग्रामीण व शहरी तरुणांमधील क्रीडागुणांना चालना देणे, आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी गुणवंत खेळाडूंची निवड करणे हा होता. या स्पर्धांमध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील एकूण ८६ स्पर्धक सहभागी झाले होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून दत्तात्रय मारकड (पत्रकार तथा कणकवली तालुका क्रीडा समन्वयक), गणेश राणे (सामाजिक कार्यकर्ते), सौ. मुस्कान खान व अब्दुल खान (सामाजिक कार्यकर्ते), मयूर गोरुले (शिवमुद्रा स्पोर्ट्स अकादमीचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते), सौ. श्रावणी मदभावे (प्रज्ञांगण संस्थापिका) व सतीश मदभावे (श्रावणी कॉम्प्युटर संचालक) उपस्थित होते. स्पर्धांचे पंच म्हणून विशाल मेस्त्री, साहिल गोरुले, हर्षद तोरस्कर व भावेश गोरुले आदींनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
खेळातून उत्तम शिस्त आणि संस्कार घडतात- दत्तात्रय मारकड याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी सांगितले की, खेळ हा केवळ मनोरंजन नसून तो शिस्त, आरोग्य, जिद्द व जबाबदारीचे संस्कार घडवतो. खेळातून स्वतःचे भविष्य घडवताना देशाचे नाव उज्ज्वल करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे असेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरापर्यंत खेळात नेण्यासाठी दत्तात्रय मारकड सर यांनी केलेल्या योगदानाबद्दल प्रज्ञांगण आणि शिवमुद्रा स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांचा कृतज्ञतेसह सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
मुलगे (१५–२९ वर्षे)
गोळाफेक : सिद्धार्थ यशवंत जठार साईप्रसाद रमेश वानोळे सिद्धेश सतीश साळुंखे
१०० मीटर धावणे : सिद्धार्थ यशवंत जठार प्रणय संतोष आडिवरेकर तन्मय संतोष कदम
कबड्डी :कासार्डे ज्युनियर कॉलेज- विजेता सेव्हन स्टार-उपविजेता
मुली (१५–२९ वर्षे)
खो-खो : शिवकन्या ग्रुप – विजेता तर सिंधू कन्या ग्रुप – उपविजेता
१०० मीटर धावणे : नेहा संतोष कदम,सानिया विलास पाळेकर ,दीक्षा अरविंद पाताडे
गोळाफेक :सारिका भानुदास राठोड,स्वप्नाली भानुदास राठोड,ज्योती मोहन आडे
सर्व विजेत्या खेळाडू व संघांना आकर्षक चषक व शासनमान्य प्रमाणपत्रे देऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र घोषित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी मदभावे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश मदभावे. यांनी केले. उत्तम नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५ अत्यंत यशस्वी ठरल्या.










