मनस्मृतीने स्त्रिया व शुद्रांना वंचित ठेवले – प्रा. सुषमा हरकुळकर

स्त्री मुक्ती दिन व मनस्मृती दहन दिनानिमित्त कणकवलीत कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : मनस्मृती हा स्त्री व शुद्राच्या खांद्यावरील जोखड होता. मनस्मृतीने स्त्रिया व शूद्रांना वंचित ठेवले होते. या ग्रंथाचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन करून स्त्री व शुद्रांच्या खांद्यावरील मनस्मृतीरुपी जोखड तोडून त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले. संविधान हा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. संविधानावर आपला देश चालत आहे. संविधानामुळे समाजात समानता प्रस्थापित झाली, असे मत भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा प्रा. सुषमा हरकुळकर यांनी व्यक्त केले.

स्त्री मुक्ती दिन व मनस्मृती दहन दिनानिमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी व भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेतर्फे डॉ. आंबेडकर भवन येथे आयोजन केले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, संजय पेंडुरकर, दीपाली चांदोसकर, चंद्रकांत म्हापणकर, रविकांत डांगमोडे, स्नेहा पेंडुरकर, रविना कांबळे, ममता जाधव, सुप्रिया तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. हरकुळकर म्हणाल्या, मनस्मृतीच्या संहिता विषारी होती. मनस्मृतीने स्त्रिया व शुद्रांवर अनेक बंधने घातली होती. मनस्मृतीमुळे स्त्रिया, शोषित, वंचित घटनांना गुलामगिरीचे आयुष्य जगावे लागत होते. या घटनांना समानताप्राप्त करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनस्मृतीचे दहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी देशाला संविधान दिले. संविधानवर आपला देश चालतो. संविधानामुळे प्रत्येकाला मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. डॉ. आंबेडकर यांच्यामुळे स्त्रिया, शोषित, वंचित, दुर्लक्षित घटकांना समाजात समानतेची वागणूक मिळत आहे. महिलांनी आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी निममित आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

आनंद कासार्डेकर म्हणाले, स्त्री मुक्त दिन व मनस्मृती दहन दिन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने तालुका, गाव स्तरावर हे दिन साजरे करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महिलांसाठी आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन हे कार्यक्रम घेण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील बौद्ध बांधवांसाठी विविध कार्यक्रम आगामी काळात घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगून लवकरच बौद्ध समाजातील बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी सुप्रिया तांबे हिने संविधानात असलेल्या कलमांविषयी माहिती दिली. प्रभाकर जाधव, ममता जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग शाखेने काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आरंभी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अपूर्वा पवार यांनी केले. यावेळी समता परिषदेचे सैनिक व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!