कलातपस्वी आप्पा काणेकर व कै. सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण म्हणजे केवळ वही, पेन आणि परीक्षेतील टक्के नव्हे तर शिक्षणातून संवेदनशील माणूस घडला पाहिजे तसेच प्रत्येकाने एखादी तरी कला जीवापाड जोपासली पाहिजे म्हणजे ती कला आपले व्यक्तिमत्व फुलवेल, आनंद देईल आणि माणूसपण घडवायला मदत ही करेल माणूस माणसाला जोडला की देश आपोआप जोडला जातो, असे उद्गार साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लेखक एकनाथ आव्हाड यांनी काढले. ते कलातपस्वी अप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली तर्फे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
येथील नगर वाचनालयाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचा पहिला कलातपस्वी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट यांना देण्यात आला. अध्यक्षस्थानी कोकणचे साहित्यिक राम मेस्त्री होते. यावेळी कलातपस्वी अप्पा काणेकर स्मृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बालसाहित्य सेवा पुरस्कार विठ्ठल कदम यांना, कला गौरव पुरस्कार प्रसाद राणे यांना, समाजभूषण पुरस्कार संजय आग्रे यांना, साहित्य वैभव पुरस्कार गौरव खतकल्ले यांना आणि कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार आदर्श शिक्षिका विधी मुद्राळे यांना, उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार स्वाती पाटील यांना देण्यात आला. तसेच सद्भावना सत्कार करण्यात आले. यामध्ये पत्रकारिता सुधीर राणे, साहित्य, कला उदय दुदवडकर, लोकसंगीत सेवा संदीप परब (बुवा) तसेच गुणवंत विद्यार्थी सन्मान व चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लेखक प्रकाश केसरकर, मुख्याध्यापक डॉ.पी. जे.कांबळे, कार्याध्यक्ष प्रशांत काणेकर, प्रसिद्धीप्रमुख निकेत पावसकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर यांनी केले. सत्कारमूर्तींना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ भेट देण्यात आले. त्याचबरोबर सन २०२५ च्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट यांनी आपल्या मनोगतात आपण विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करीत आलो आहे. काणेकर ट्रस्टच्या पुरस्काराने माझी आणखीन जबाबदारी वाढली, असे उद्गार यावेळी काढले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश कदम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.दर्शना पाताडे यांनी केले.










