वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी फोंडा रस्त्यालगत आचिर्णे माळावर अचानक लागलेल्या आगीत सुमारे ५० एकर ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातात आलेले पीक असे डोळ्यादेखत जळून खाक झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसापासून ऊस तोड सुरु झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तोड होऊन शेतकऱ्यांच्या हाती पैसे येणार होते. परंतु शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आचिर्णे मधलीवाडी जवळील माळरानाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण करीत ५० एकर ऊस शेती आगीत जळून खाक झाली आहे. आग एवढी भयानक होती की आग विझवणे कोणालाही शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या आगीमध्ये रुपेश सदानंद रावराणे, दिनकर केरबा लोटेकर, बळवंत श्रीपती बर्गे, वसंत सोनू कदम,शशिकांत श्रीधर रावराणे, यशवंत सपकाळ, मोहन मांजलकर या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून या घटनेचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी माज़ी सरपंच रुपेश रावराणे यांनी केली आहे.










