इन्सुली एक्साईज चेकपोस्ट ची तुफानी कारवाई
बांदा (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोव्यातून अवैधरीत्या मद्य वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरवर मोठी कारवाई करत सुमारे ५५ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी याज्ञेशकुमार राजेंद्रकुमार शुक्ला (वय ५०, रा. गुजरात) याला अटक करण्यात आली आहे.
जप्त मुद्देमालामध्ये ४० लाख ५६ हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य, १० लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा चॉकलेटी रंगाचा सहाचाकी बंद बॉडी कंटेनर तसेच १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून इन्सुली तपासणी नाक्याच्या हद्दीतून संशयास्पद कंटेनर येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास इन्सुली तपासणी नाक्यावरील पथकाने सदर वाहन थांबवून झडती घेतली. झडतीदरम्यान वाहनाच्या मागील भागात गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे बॉक्स लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, रणजीत पेम (नि. वाहन चालक), दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री व सतीश चौगुले यांनी संयुक्तपणे केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.










