रत्नागिरी (प्रतिनिधी) : बारसू येथील प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला असून गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत. आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाची चाचपणी करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्यात येत आहे. याचे काम सुरु झाले आहे. मात्र, स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. गेले दोन दिवस ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. पोलिसांनी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना अटक केली आहे. तर काही ग्रामस्थांना ताब्यात घेतले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या बारसू दौऱ्याच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना नोटीसा बजवण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या बारसू दौऱ्याच्या अनुषंगाने या नोटीसा बजवण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना नोटीस बजवण्यात आली आहे. तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपणावर कारवाई होईल, असे बजावण्यात आले आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे ही नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आपण रिफायनरीच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रिफायनरीच्या मुद्यावरुन ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे पुढे आले आहे. शिवसेना स्थानिकांच्या बाजूने असल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणत असले तरी स्थानिक आमदार मात्र प्रकल्पाच्या बाजूने, असे चित्र दिसून येत आहे. रिफायनरीला राजन साळवी यांचा पहिल्यापासून पाठिंबा आहे, तर खासदार विनायक राऊत विरोधात आहेत. राजन साळवी यांनी ट्विट करुन प्रकल्पाला समर्थन दिले आहे. कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच राहिल, असे सावळी यांनी म्हटले आहे. माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करु नये, असे सावळी यांनी म्हटले आहे.