फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स नॅशनल कॉम्पिटिशन (रीजनल लेव्हल) स्पर्धेत कणकवली येथील एनटीटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरच्या 21 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत त्यापैकी दहा विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकली असून 11 विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मन्सचे गोल्ड मेडल मिळाले आहे.
दरम्यान राष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत महाराष्ट्रसह इतर राज्यातील मिळून सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामधून कणकवलीतील एनटीटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे कणकवली शहरात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक होत आहे.
यावेळी झालेल्या अबॅकस स्पर्धेत भौमिक संदीप अंधारी (दुसरा क्रमांक), भाग्येश विवेक सावंत (चौथा क्रमांक) व जयेश सचिन पाटील याने पाचवा क्रमांक पटकावला असून याशिवाय वेदा आनंद सावंत, स्वरा विजय परब, जागृती पांडुरंग खरात, मधुरा विजय परब, जय पांडुरंग खरात, अंश नारायण राठोड, देविका मनोज तावडे, तनया योगेश पवार, रियांश राकेश चव्हाण, रणजीत शैलेश गावकर, दुर्वांक निलेश राणे या विध्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
तर वैदिक मॅथ स्पर्धेत नंदिनी मनीष राणे (प्रथम क्रमांक), अनय संजय सावंत (द्वितीय क्रमांक), स्विझल नॅपसन डिसोजा (तृतीय क्रमांक), तुबा एयाज शेख (चतुर्थ क्रमांक), उमैझा रफिक शेख (पाचवा क्रमांक), गार्गी विनोद तांबे (सहावा क्रमांक), नारायण रमेश रणशूर (सातवा क्रमांक) पटकावल्याने यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
जगभरात अबॅकसचा वापर ब्रेन डेव्हलपमेंट साठी प्रभावी माध्यम म्हणून केले जात आहे. विशेषता सहा ते चौदा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचा असतो. यामुळे या वयोगटातील विद्यार्थ्यांनी अबॅकस प्रशिक्षण घेतल्यास त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, वेगवान गणना क्षमता यामध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
तसेच वैदिक मॅच शिकल्याने मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात वाढ होऊन गणिताबद्दलची भीती दूर होते. आत्मविश्वास वाढीस लागतो स्मरणशक्ती वाढते तसेच अवघड व कनिष्ठ गणिते काही सेकंदात सोडवता येतात. स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ वाचवण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी वैदिक मॅथ्स हे तंत्रज्ञान खूप प्रभावी आहे.
कणकवलीतील एनटीटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरच्या विद्यार्थ्यांनी तीन महिन्याचा सातत्यपूर्ण सराव शिस्तबद्ध प्रशिक्षण व आत्मविश्वासाच्या जोरावर हे दैदीप्यमान यश संपादन केले असून या यशाबद्दल कणकवली शहरातील सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. या उल्लेखनीय यशामागे एनटीटी प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक मॅथ्स सेंटरच्या संचालिका पूजा राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.










