‘नववर्ष धुंदीत नव्हे, शुद्धीत साजरे करूया’ — अर्पिता मुंबरकर
नशाबंदी मंडळामार्फत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे
कुडाळ (प्रतिनिधी) : नवीन पिढीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी पालकांच्या वागणुकीतूनच होत असते. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतच मुले घडत असतात. त्यामुळे पालकांनी व्यसनमुक्त जीवन जगणे अत्यंत गरजेचे असून, गरज भासल्यास मुलांनीच पालकांकडे व्यसने सोडण्याचा आग्रह धरला पाहिजे, असे प्रतिपादन नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले. नशाबंदी मंडळ, व्यसनमुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रम तसेच पी. एम. श्री. जि. प. प्राथमिक शाळा पांडुरंग शेठ पडते, पडतेवाडी आणि पी. एम. श्री. जि. प. प्राथमिक शाळा कुंभारवाडा, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा व मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अर्पिता मुंबरकर यांनी “नववर्ष धुंदीत नव्हे, शुद्धीत साजरे करा”, “आम्ही प्राणी असून कोणतेही व्यसन करत नाही, तुम्ही तर बुद्धिमान माणसे आहात” आणि “चला, व्यसनाला बदनाम करूया” असा प्रभावी संदेश दिला.

त्या पुढे म्हणाल्या की, गाय, बैल, हत्ती, घोडा, कुत्रा, मांजर, वाघ, सिंह यांसारख्या प्राण्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनांची गरज लागत नाही. ते तंबाखू, गुटखा खात नाहीत किंवा दारू पिऊन रस्त्यावर लोळत नाहीत. मात्र माणूस हे सर्व करताना दिसतो, ही चिंतेची बाब आहे. व्यसनांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, आजार वाढतात, अपघात घडतात, तरीही व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः कोणतेही व्यसन करू नये आणि घरातही कोणतेही व्यसन येऊ नये यासाठी पालकांकडे ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांना “तुमच्या पावलावर” ही व्यसनमुक्ती विषयक चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच साप-शिडी या खेळाच्या माध्यमातून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आल्या. ३१ डिसेंबरसारखे सण-उत्सव साध्या, कौटुंबिक वातावरणात साजरे केल्यास कुटुंब सदैव आनंदी राहू शकते, असा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात “घराघरातून रुजवा आता एवढाच संदेश, करा रे निर्व्यसनी हा देश” या व्यसनमुक्ती गीताने झाली. शेवटी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमात मुख्याध्यापक लक्ष्मण आगलावे आणि स्वप्नाली सावंत यांनी आपले विचार मांडले. तसेच सायली कदम, चैत्राली पाटील, ऋतुजा गावडे, स्वराली लाड, गुरुप्रसाद सावंत, गौरी गोसावी, वंदना परब, दिपाली मोहिते, कृष्णा गावडे, सुविद्या चव्हाण, प्राची भोगटे, मनीषा ठाकूर, मीरा गावडे, शिल्पा राणे, मथुराराणी परब, माधवी सावंत, परिणी बगळे, स्नेहल दळवी, वैदेही गोसावी, वैष्णवी केळुसकर, सरिता परब आदी शिक्षकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

दरम्यान, “चला व्यसनाला बदनाम करूया” या अभियानाची सुरुवात पंधरा दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसर सावंतवाडी येथील एम. एस. डब्ल्यू. कॉलेज यांच्या सहकार्याने माणगाव येथे महिला मेळाव्याने करण्यात आली होती. त्यानंतर वैभववाडी, देवगड, मालवण, कुडाळ आणि कणकवली तालुक्यांमध्ये युवक, महिला, अंगणवाडी सेविका तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून व्यापक जनजागृती करण्यात आली. या अभियानाचा समारोप पडतेवाडी व कुंभारवाडा कुडाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत करण्यात आला.













