राजकोट किल्ल्यावर पर्यटकांसाठी बायो टॉयलेटची सुविधा; पर्यटकांची गैरसोय दूर
मालवण (प्रतिनिधी) : येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र, या ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांनी तत्परतेने याठिकाणी बायो टॉयलेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राजकोट किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छतागृहाअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी ही समस्या नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांच्याकडे मांडली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बापर्डेकर यांनी नगरपरिषद स्तरावरून बायो टॉयलेट मंजूर करून घेतले. केवळ टॉयलेट उपलब्ध करून देऊन न थांबता बापर्डेकर यांनी स्वखचनि व स्वतः लक्ष घालून या बायो टॉयलेटची जोडणी आणि आवश्यक ती सर्व व्यवस्था पूर्ण करून घेतली. त्यामुळे आता पर्यटकांना याठिकाणी तातडीची सेवा मिळणे शक्य झाले आहे. ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मूलभूत सुविधा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जनसामान्यांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढल्याबद्दल नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पर्यटकांनीही त्यांचे आभार मानले आहेत.










