निबंध स्पर्धा, प्रदर्शने ते रक्तदान शिबिर, जनजागृती व सामाजिक उपक्रमांचा सप्ताह
तालुक्यातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि सामाजिक संघटनांना सहभाग घेण्याचे आवाहन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी पोलीस ठाण्याने शहरात आणि तालुक्यात विविध जनजागृतीपर व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सप्ताहाची सुरुवात २ जानेवारीला सकाळी १० वाजता आरपीडी स्कूलमध्ये आयोजित निबंध स्पर्धेने होईल. याच दिवशी मळगाव हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पोलीस कामकाज, सायबर गुन्हे आणि शस्त्रास्त्रांची माहिती देणारे प्रदर्शन भरवले जाणार आहे. नागरिकांना पोलीस दलाच्या कार्याची जवळून ओळख व्हावी, यासाठी ३ जानेवारीला सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत तीन मुशी नाका येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात विशेष स्टॉल्स उभारले जातील. यामध्ये सायबर सेल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, भरोसा सेल, वाहतूक शाखा आणि शस्त्रास्त्र विभागाची माहिती दिली जाईल. तसेच पोलीस वाद्यवृंद पथकाचे सादरीकरणही येथे होणार असून, नागरिकांचा प्रतिसाद पाहून या प्रदर्शनाची वेळ वाढवण्यात येईल. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे ४ जानेवारीला पोलीस ठाण्यासमोरच्या मैदानावर पोलीस, पत्रकार, पोलीस पाटील आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या निमंत्रित संघांसाठी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी ५ जानेवारीला सकाळी ६:३० वाजता मोती तलाव परिसरात ‘मॉर्निंग वॉक’चा कार्यक्रम होईल, ज्यामध्ये विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होतील. ६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता पोलीस ठाण्याच्या आवारात ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा तसेच महिलांसाठी विविध खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. सप्ताहाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ७ जानेवारी रोजी रोटरी क्लब आणि अन्य संघटनांच्या सहकार्याने पोलीस ठाण्याच्या सभागृहात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये तालुक्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे.












